ठाणे -कल्याणातील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा. तरुणांना मी सल्ला देतो की त्यांनी कल्याण डोंबिवलीत चांगला रस्ता शोधून दाखवण्याची स्पर्धा घ्यावी. अशी खोचक टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर उपस्थित होते. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या मंत्र्याने टीका केल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला टोला लागवल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
हेही वाचा -कल्याणमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे घरफोडी करणाऱ्या पती-पत्नीसह साथीदार जेरबंद
कल्याण डोंबिवली शहरात काँक्रिट रस्त्याची कामे सुरू असली तरी अनेक रस्ते उखडले असून या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास होत आहे. शिवाय याचा फटका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कल्याण डोंबिवलीत एका कार्यक्रमाला येताना बसल्याने पालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्ड्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचे सांगत, प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर त्यांनी खोचक टीका केली. यामुळे आगामी पालिका निवडणुकीतही खड्ड्यांवरून राजकारण तापणार असल्याचे दिसून येते.