मीरा-भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाचे काम झाडांच्या स्थलांतरणासाठी प्रलंबित होते. परंतु, आता पालिका प्रशासनाकडून झाडांच्या स्थलांतर कामाला गती आली आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाचा अडथळा दूर झाला आहे.
मेट्रोसाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांचे स्थलांतर... - मीरा भाईंदर महानगरपालिका
मेट्रोच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ५९० झाडांना महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंडावर पुर्नलागवड करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मीरा भाईंदर शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या पाहता मीरा भाईंदर ते दहिसर मेट्रो ९ च्या प्रकल्पाला तत्कालीन सरकारने हिरवा कंदील दिला. मेट्रोच्या कामाला मंजुरी मिळाली. परंतु, मीरा भाईंदर शहरातील मेट्रोच्या मंजूर नकाशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गाच्या मध्यभागी असलेल्या झाडांच्या स्थलांतरबाबत अडथळा निर्माण झाला होता.
कोरोनाच्या काळात टाळेबंदी असल्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. आता मेट्रोच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ५९० झाडांना महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंडावर पुर्नलागवड करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काशीमीरा नाका ते सावरकर चौक मुख्यमार्गावर ५९० पामचे झाडे आहेत. ते हटवल्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नव्हता. त्यामुळे ही झाडे क्रेनच्या साहाय्याने मूळापासून काढून टेम्पोमध्ये टाकण्यात येत आहेत. झाडे व्यवस्थितरित्या काढून आरक्षण भूखंडावर लागवड करण्याची जबाबदारी मेट्रो ठेकेदाराला पालिकेने दिली आहे. आरक्षण क्र.230, आरक्षण क्र.269, आरक्षण क्र.273 आणि आरक्षण क्र.300 मध्ये ही झाडे लावण्यात आली असल्याची माहिती उद्यान निरिक्षक हंसराज मेश्राम यांनी दिली.