ठाणे- आपल्या गावाला जाण्याकरता शेकडो मजूर पायपीट करत जीवघेणा प्रवास करत आहेत. लोंढेच्या-लोंढे मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघत आहेत. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करुन या मजूरांना परत पाठवले. त्यानंतर रस्त्यावर पोलीस आडवतात म्हणून अनेक मजूर चक्क रात्रीच्या अंधारात नाल्यातून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
परप्रांतीय मजुरांचा चक्क नाल्यातून प्रवास गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय मजूर कुटुंबांसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात जाण्यासाठी मुंबईहून निघाले आहेत. शनिवारी मुंबईहून उत्तर भारतीयांना घेऊन निघालेली चारचाकी वाहने आणि रिक्षांचे प्रमाण वाढल्याने नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा-इगतपुरी दरम्यान 5 तास वाहतूक कोंडी झाली होती.
मुलूंड आणि ठाणेलगत असलेल्या आनंदनगर टोल नाक्यावरुन गेल्यास पोलीस अडवत आहेत, हे मजुरांना माहित झाले. त्यानंतर हे मजूर पोलिसांची नाकाबंदी चुकवण्यासाठी चक्क आनंदनगर टोलनाक्यालगत असलेल्या नाल्यातून मध्यरात्री प्रवास करताना दिसले. धक्कादायक म्हणजे, लहान मुलं आणि महिला देखील या नाल्यातून प्रवास करत आहेत. नाल्यात विविध जिवजंतू, साप, विषारी किटाणू आणि नाल्याचं घाण पाणी याची भिती असून ही गावाला पोहोचायचे म्हणून हे परप्रांतीय मजूर आता आपला जीव धोक्यात टाकू लागले आहेत.
नाल्यातून रस्ता पार करताना काही नागरिकांनी या मजुरांना पाहिले. मात्र, त्यांनी या मजुरांना हटकले नाही. नागरिकांनी या मजुरांना पाणी आणि जेवण दिले.