ठाणे :मर्चंट नेव्हीच्या एका कामगाराने भिवंडी तालुक्यातील कशेळी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तर, नारपोली पोलिसांनी ठाणे अग्निशामक दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो आढळून न आल्याने सायंकाळी शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. राहुल संदीप जोशी (27 वर्षीय, रा. बांगर नगर, काल्हेर, भिवंडी) असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराने नाव आहे.
मर्चंट नेव्हीच्या कामगाराची कशेळी खाडीत उडी मारून आत्महत्या - narpoli police station
मर्चंट नेव्हीच्या एका कामगाराने भिवंडी तालुक्यातील कशेळी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तर, नारपोली पोलिसांनी ठाणे अग्निशामक दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो आढळून न आल्याने सायंकाळी शोध मोहीम थांबविण्यात आली आहे.
मृत राहुल हा मर्चंट नेव्हीमध्ये कामगार म्हणून कार्यरत होता. मात्र, सध्या काम बंद असल्याने घरी होता. व मागील एक महिन्यांपासून शीघ्रकोपी स्वभाव असल्याने तो मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत असल्याची माहिती राहुलची बहिण निशा जोशी यांनी दिली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास त्याच्या औषध (गोळ्या) संपल्याने तो रागात घरातून निघून बाईक घेऊन कशेळी येथे मित्र समीर याच्या घरी गेला होता. त्या दरम्यान वडिलांनी संपर्क साधला असता त्याने घरी येणार नाही असे सांगितल्याने ते घरी निघून आले. काही वेळाने मित्र समीर हा काल्हेर येथे राहुलच्या घरी येऊन तो त्याचा मोबाईल आपटून मी कोठे आहे हे समजल्याचा राग मनात ठेवून तेथून निघून गेल्याचे सांगितले.
त्यानंतर राहुलचे वडील हे कामासाठी ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना खाडीपुलावर गर्दी व त्या ठिकाणी आपल्या मुलाची बाईक आढळून आली. त्यांना याबाबत नागरिकांनी माहिती दिल्यावर ही घटना कुटुंबियांना समजली तर त्यांना धक्काच बसला. दरम्यान, नागरिकांसह ठाणे अग्निशामक दलाच्या जवानांनी खाडी पात्रात राहुलच्या मृतदेहाचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. सायंकाळी अंधार पसरल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. तर, नारपोली पोलिसांनी त्याच्या बेपत्ता असल्याबाबतची खबर दाखल केली आहे.