मीरा भाईंदर -महानगरपालिकेअंतर्गत काशिगाव येथील सिल्व्हर सरिता परिसरात पालिकेच्या आरक्षण क्रमांक ३१८मध्ये परिसरातील बेघरांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र सध्या या केंद्राला गळती लागली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केंद्राची सुरक्षा राम भरोसे असल्याने ते आता दारूचा अड्डा बनले आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नगरसेविका रुपाली शिंदे (मोदी) यांनी निवारा केंद्राची पाहणी करून केंद्राच्या दुरवस्थेबाबतची तक्रार पालिकेला पत्राद्वारे केली आहे.
पालिकेच्या रात्र निवारा केंद्राला गळती निवारा केंद्राची दुरावस्था
काशीगाव येथील आरक्षित जागेत पालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्ची घालून इमारत बांधली. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या निवारा केंद्राची अवस्था एखाद्या मोडकळीस आलेल्या इमारतीसारखी झाली आहे. इमारतीच्या काचा तुटलेल्या आहेत. त्या निवारा केंद्रात सहजरित्या कोणीही प्रवेश करू शकतो. बेघर लोकांना निवारा मिळावा, यासाठी बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रामधील सुरक्षेसाठीा लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद असल्याने त्यात निवारा घेणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकेच्या रात्र निवारा केंद्राला गळती केंद्रासाठी मदत
तीन वर्षापूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून सुरु करण्यात आलेले रात्र निवारा केंद्र "उषा लोट्रिकर चेरिटेबल ट्रस्ट"ला देखभालीसाठी देण्यात आले आहे. एक वर्षापासून या ठिकाणी लोकांची देखभाल या ट्रस्टमार्फत योग्यरीत्या घेतली जात असली तरीही रात्र निवारा केंद्रातील सर्वजण पालिकेच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करत आहेत. या केंद्रात १५ वयोवृद्ध, ५ मंदबुद्धी इतर १० व देखरेखीसाठी २ कर्मचारी अशा प्रकारे एकूण ३२ जण राहतात. केंद्रात त्याना २ वेळचे जेवण, नाश्ता, चहा मोफत दिला जातो. यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही स्वरुपात पैसे घेतले जात नसल्याचे सांगण्यात येते.