ठाणे - कल्याण-डोंबिवली नंतर ठाण्यातही कोविड सेंटर उभारणीत घोटाळा झाला असून केवळ कंत्राटदारांसाठी उभारलेल्या या कंत्राटांचे मातोश्रीशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. या आरोपातून सोमैया यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, या सर्व व्यवहारांची काळी पत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी सोमैया यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक प्रकरणावर बोलताना एका घोटाळ्यात भुजबळ हे तीन वर्ष तुरुंगात होते, आता घोटाळेबाज सरनाईक किती वर्षासाठी जातात, हे बघूया, असा टोलाही सोमैया यांनी लगावला.
हेही वाचा -बलात्कार करून तरुणीला लोकलमधून ढकलले; वाशी खाडीपुलावर जखमी अवस्थेत आढळली तरूणी
कोरोना रुग्णांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने एकूण सात कोविड सेंटर उभारली असून यातील व्होल्टास, बोरिवडे आणि ग्लोबल हॉस्पिटल ही तीनच कोविड सेंटर सुरू आहेत. या तिन्ही सेंटरची क्षमता १ हजार ८७५ असताना रुग्णसंख्या मात्र अवघी २५२ आहे. सोमैया यांनी तिन्ही कोविड सेंटरची आज दुपारी पाहाणी केली. याप्रसंगी सोमैया यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, भाजप गटनेते संजय वाघुले व महा पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.