ठाणे- शहरात सध्या धोकादायक इमारतीचा प्रश्न तापला आहे. या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींमध्ये अजूनही वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्याबरोबरच पाणी कनेक्शन तोडण्याचा आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला होता. मात्र, नागरिकांना बेघर करण्यापूर्वी पालिकेने त्यांना हमी पत्र देण्याची मागणी, ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.
या हमीपत्रामध्ये इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच राहत्या घराचे मोजमाप आणि धोकादायक इमारत म्हणून ही इमारत तोडण्यात येत असल्याचा उल्लेख असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हमीपत्र मिळाल्याशिवाय घरे खाली केली जाणार नसून या मुद्द्यावरून धोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक शुक्रवारी पालिका मुख्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती संजीव साने यांनी दिली आहे.
शहरातील बहुतांश अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही ज्यांनी इमारती खाली केलेल्या नाहीत, अशा लोकांच्या घरावर ही कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ, नये म्हणून पालिकेने ही पाऊले उचलली असली तरी काही इमारती धोकादायक नसताना त्या धोकादायक ठरवून विकासकांच्या फायद्यासाठी या इमारती रिकाम्या करण्यात येत असल्याचा आरोप साने यांनी केला आहे. एकदा इमारत रिकामी करुन पडल्यानंतर त्या रहिवाशांचा राहण्याचा दावा निघून जात असल्याने हे हमीपत्र अत्यंत महत्त्वाचे असून ते घेतल्याशिवाय इमारत खाली करू नये, असे आवाहन साने यांनी केले आहे. तर यामध्ये घराचे मोजमाप देखील अतिशय महत्त्वाचे असल्याचे अभियानाचे पदाधिकारी शाळीग्राम यांनी सांगितले.
इमारत खाली करताना भोगवटदारांची यादी, त्या इमारतीमधील घरांचे मोजमाप, हे संबंधित प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांना नगर विकास खात्याला देणे बंधनकारक असल्याचे महेंद्र मोने यांनी सांगितले. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी २ एफ एस आय देण्यासाठी राज्य शासनाकडे चार वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नसल्याचे मोने यांनी सांगितले. जर २ एफएसआय मंजूर केले तर साडेचार हजार इमारतींचा पुनर्विकास होणार असल्याचे मोने यांनी सांगितले आहे.