ठाणे :अंबरनाथच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या केमिकल कंपनीत जोरदार स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. यात एका कामगाराचा मृत्यू झाला. तर 5 कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूर्यकांत झिमान असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारच नाव आहे. एमआयडीसीतील ब्ल्यूजेट हेल्थ केअर लिमिटेड या केमिकल कंपनीत जोरदार स्फोट होऊन भीषण आग लागली होती.
एका कामगाराचा मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पश्चिम भागातील वडोलगाव गावाच्या हद्दीत एमआयडीसी आहे. या एमआयडीसीमध्ये ब्ल्यूजेट हेल्थ केअर लिमिटेड कंपनी आहे. या कंपीनीत एकूण पाच केमिकल प्लांट आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास पाचपैकी दोन नंबरच्या प्लांटमध्ये अचानक भीषण स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशामक दल, एमआयडीसी अग्निशामक दल, आणि कंपनीतील कामगार एकत्रितपणे ही वायू गळती रोखण्याचा प्रयत्न करीत दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. केमिकल कंपनीचा झालेला स्फोटात सूर्यकांत हा कामगार जागीच मृत्यूमुखी पडला असून 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.या गंभीर जखमी कामगारांवर उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.