ठाणे - कोरोना संकटात कोरोनाशी दोन हात करत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भिवंडीतील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत. त्यांनी थेट मशिदीमध्येच सर्वधर्मीय बांधवांसाठी निःशुल्क ऑक्सिजन सेंटर उभारून अनेक रुग्णांचे जीव वाचवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
जमात ए इस्लाम ए हिंद मस्जिद ट्रस्ट भिवंडी शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरात 'जमात ए इस्लाम ए हिंद मस्जिद ट्रस्ट', भिवंडी अंतर्गत असलेल्या मक्काह मशिदीमध्ये मस्जिद ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात लॉकडाउन घोषित झाल्यापासून सर्वच धार्मिकस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. अश्यातच एका मशिदीचे कोरोना रूग्नांवरही उपचार करीत असलेली बहुदा महाराष्ट्रातील पहिलीच मशीद असल्याचे बोलले जात आहे.
सध्या कोरोना संकटात कोरोनासह कोरोना व्यतिरिक्त इतर आजारपणातील रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटर या ऑक्सिजन सेंटरमध्ये मशिदीत उपलब्ध करण्यात आले आहे. देशासह भिवंडी शहरात कोरोनाबाधीत रुग्णांनाची संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातच भिवंडी शहरातील कोरोना आणि कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारपणातील रुग्णांना उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 246 वर पोहचली असून 105 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भीतीने शहरातील अनेक खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करत नाहीत हे उघड सत्य आहे. अनेक अत्यावस्थ रुग्णांना खासगी रुग्णालये तपासणी न करता पुढच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असल्याने रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवण्यातच अनेक रुग्णांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहेत. तर कोरोना माहामारीच्या भीतीने सुमारे २ लाख परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यातच सध्याच्या परिस्थितीत रुग्णांची होणारी ही हेळसांड आणि गैरसोय लक्षात घेता शांतीनगर येथील मक्का मशिदीमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजन सेंटर उभारले आहे. विशेषतः हे ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी पूर्णतः मोफत सुविधा पुरवत आहे. मशीदमध्ये उभारलेल्या या ऑक्सिजन सेंटरमध्ये हिंदू - मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्माच्या रुग्णांवर तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करून तत्काळ उपचार केले जात आहेत.
हेही वाचा -'कॅप्टन कुल' धोनी बनला शेतकरी!.. व्हिडिओ व्हायरल
मक्का मशिदीत 18 जूनपासून हे ऑक्सिजन सेंटर या ठिकाणी रात्रंदिवस चोवीस तास सुरु आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना या ऑक्सिजन सेंटर मध्ये ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येते. जोपर्यंत रुग्णांना रुग्णालये उपलब्ध होत नाही, तोपर्यंत या ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या ऑक्सिजन सेंटर मध्ये ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. या ऑक्सिजन सेंटर मध्ये सध्या 5 बेड आणि 8 ऑक्सिजन बाटले उपलब्ध असून 2 नेबिलायझर उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, त्या रुग्णांना येथे तात्काळ उपचार देण्यात येतात. त्यासाठी या ऑक्सिजन सेंटर मध्ये 4 ते 5 डॉक्टर तत्काळ उपलब्ध करण्यात येत असून 7 जणांचा मेडिकल स्टाफ व डॉ. सलीम शेख व डॉ. सर्फराज खान हे दोन असिस्टन्स डॉक्टर येथे चोवीस तास उपलब्ध असून सध्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्व रुग्णांना येथे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. सोबतच सुरक्षिततेच्या सर्व साधनांचा वापर करून रुग्णांना येथे मोफत उपचार देण्यात येत आहेत. त्याच बरोबर ज्या रुग्णांना या ऑक्सिजन सेंटरपर्यंत येता येत नाही किंवा ज्या रुग्णांना ऑक्सिजनची जास्त आवश्यकता आहे. अशा रुग्णांना घरी जाऊन ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. त्यासाठी 30 छोटे ऑक्सिजन बाटले सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांवर देखील या ऑक्सिजन सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. आतापर्यंत या मक्काह मस्जिद ऑक्सिजन सेंटर मध्ये 150 हून अधिक रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा आणि उपचार करण्यात आले असून त्यात 23 हिंदू बांधवांनी देखील उपचार घेतले आहेत. या ऑक्सिजन सेंटरसाठी नगरसेवक रियाज शेख यांच्यासह कैसर मिर्जा, अर्शद मिर्जा व त्यांचे सहकारी तसेच मक्काह मस्जिद व शांतीनगर ट्रस्टचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत. दरम्यान, माणुसकीची जाण ठेवत थेट मशिदीत उभारलेले हे ऑक्सिजन सेंटर म्हणजे सध्यच्या कोरोना संकटात रुग्णांसाठी व येथील नागरिकांसाठी जीवनदान सेंटरच ठरत आहे.
हेही वाचा -'आम्ही अशा शिव्या देऊ की विरोधकांना झोप लागणार नाही'...