ठाणे - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आरक्षणासाठी ठाण्यात साखळी उपोषण करण्यात येत आहे.
सत्ताधारी आणि विरोधकात मराठा आरक्षणावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. त्यातच ठाणे जिल्हा सकल मराठा समाजच्या वतीने तीन दिवसांच्या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असून पुन्हा आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आम्हाला राज्य आणि केंद्र सरकारशी संबंध नाही, आम्हाला फक्त आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका समाजाचे नेते रमेश आंब्रे यांनी मांडली.