ठाणे : Eknath Shinde on Maratha reservation : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. मराठा आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण देण्याचा आमच्या सरकारचा निर्धार आहे. आम्ही कोणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही. कायमस्वरूपी आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. याशिवाय समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन देखील शिंदे यांनी केलंय.
आरक्षणासाठी आणखी वेळीची गरज : मराठा समाजाला आधी आरक्षण दिलं होतं, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर आमच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला आणखी काही काळ हवा आहे. त्यामुळं आंदोलकांनी स्वतःचा, कुटुंबाचा विचार करायला हवा. आरक्षणासाठी वाट्टेल ते करायला आम्ही तयार आहोत. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.