नवी मुंबई -मराठा जोडाे अभियानाचा तिसरा टप्पा आज नवी मुंबईत पार पडला. या निमित्ताने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता वाशीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीचा समारोप नेरूळ येथे करण्यात आला. राज्यातील मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी हे अभियान सुरू आहे.
राज्य सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, मात्र राज्य सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा
राज्यात सध्या कोरोनाचे सावट आहे, त्यामुळे आम्ही सर्व एकत्र येऊन आंदोलन करू शकत नाही. मात्र सरकारने तोपर्यंत आरक्षणावरील स्थगिती उठवली नाही, तर मात्र आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.