नवी मुंबई - सकल मराठा समाज, रायगड जिल्हास्तरीय बैठक आज पनवेलच्या व्ही.के.हायस्कूल येथे संपन्न झाली. पेण, उरण, कर्जत, पनवेल, खालापूर येथील मराठा समन्वयक या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या समन्वयकांनी अनेक बाबींवर नाराजी व्यक्त केली. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज नाराज, पनवेलमध्ये बैठक मराठा आंदोलनासंदर्भातील बैठकीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक प्रवेशावर बंदी बाबतचा निर्णय ज्या तत्परतेने घेतला त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, राज्य सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण कायम ठेवण्याबाबत तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सर्व मराठा समाज प्रचंड नाराज असुन ही नाराजी व्यक्त करण्यासाठी घटनात्मक मार्गाने शासकिय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याबाबत सर्वांचे एकमत या बैठकीत झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वयकांशी समन्वय साधून आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, असेही या बैठकीत ठरले. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणत्याही विभागात नोकरभरती करू नये, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. या बैठकीत विनोद साबळे, गणेश कडू, वृषाली शेडगे, राजश्री कदम, स्वप्निल काटकर, तुषार सावंत, दशरथ पाटील, प्रदीप देशमुख, सुहास येरुनकर, रुपेश कदम, राजू भगत, यतीन देशमुख, सचिन भगत, विकास वारदे, राजू नलवडे आदी मराठा समन्वयक उपस्थित होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा सामाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यानंतर सरकारी स्पर्धा परीक्षा, पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य शैक्षणिक बाबींमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. यामुळे सध्या मराठा समाजात नाराजीचे वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज पुन्हा आक्रमक होण्याची चिन्ह असून काही ठिकाणी तुरळक प्रमाणात आंदोलनं करण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणी सर्वोच्च न्यायालयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.