ठाणे :जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिलांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन विक्री उद्घाटन सोहळा शहापूर तालुक्यातील आसनगाव भागात असलेल्या जोंधळे महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. या वेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या विविध योजनेचे उदघाटन करण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे भाषण संपल्यावर अचानक कार्यक्रमास्थळाचा भव्य मंडप कोसळल्याने अनेक महीला जखमी झाल्या आहेत. तर, या घटनेमुळे दिवसभर असलेला कार्यक्रम अर्ध्यावरच गुंडाळावा लागला आहे.
जखमी महिलांना उपचारासाठी केले दाखल :जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने स्वयंसहाय्यता गटातील महिलांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शहापूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी केंद्रीय ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह, भिवंडी खासदार तथा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील हे उपस्थित होते. मान्यावरांचे भाषण संपल्यावर महीलाच्या कार्य शाळेचा कार्यक्रम सुरू असताना आज दुपारच्या सुमारास अचानक मंडपसह कमानी कोसळल्याने अनेक महीला जखमी झाले असून त्यांना शहापूरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.