ठाणे- तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथे देवस्थानचे विश्वस्त मनोज प्रधान यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे प्रधान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी संस्थेचे माजी अध्यक्ष मनोज प्रधान यांनी तब्बल 3 कोटी 22 लाख 85 हजार 658 रुपयांचा अपहार केल्याचे एक वर्षापूर्वी उघडकीस आले होते. संस्थेच्या मुलुंड येथील कॉर्पोरेशन बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवी ठेवत असताना त्या न ठेवता सदर रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरली आणि त्याच्या बनावट पावत्या बनवून त्या संस्थानच्या कार्यालयात ठेवून अपहार केला होता. हा अपहार अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी उघडकीस आणला. त्याबाबत लेखी तक्रार गणेशपुरी पोलीस ठाण्यात आणि आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे येथे केली होती.
हेही वाचा - भिवंडीत ज्वलनशील केमिकल साठ्यावर पोलिसांची धाड, ८ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक
दरम्यान, तक्रार दाखल करूनही प्रधान यांच्यावर राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता. त्यामुळे वज्रेश्वरी गावातील ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले होते. स्थानिकांच्या आंदोलनामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि गणेशपुरी पोलीस ठाणे यांनी कल्पेश पाटील यांच्या लेखी तक्रारीवरून मनोज प्रधान यांच्यावर पैशांचा अपहार, फसवणूक अशा विविध सात कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात कल्पेश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावत प्रधान यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, प्रधान यांनी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळून लावत १८ ऑक्टोबरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - डोंबिवलीतील मृत महिलेच्या पायातील पैजणांनी उलगडले खुनाचे प्रकरण