ठाणेMaratha Reservation : मराठा आंदोलनाचे ब्रँड बनलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन शक्ती प्रदर्शन केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज ठाण्यात त्यांनी मराठा समाजाचा जोर दाखवला. ठाण्यातील सभागृहातील घेतलेल्या सभेमध्ये आसनावर न बसता संपूर्ण भाषण उभ्याने केलं. त्यामुळं उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती. आज झालेल्या सभेत आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांचा संपूर्ण रोख छगन भुजबळ यांच्यावरच असल्याचं दिसून आलं. छगन भुजबळ यांच्याशी वैयक्तिक वाद नसून वैचारिक मतभेद असल्याचं सर्वप्रथम त्यांनी स्पष्ट केलं. आपल्याला पटांगणामध्ये लढण्याची सवय असून आपण कोणाच्या हाताला लागणार नाही, असं सूतोवाच त्यांनी केलं. सरकारने मराठा आरक्षणासाठी दिलेला वेळ त्यांना पाळावाच लागेल.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जरांगे यांचं जंगी स्वागत : मराठा आरक्षणाचा चेहरा बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठाणे नगरीत मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. ठाण्यातील माजीवाडा जंक्शन कॅडबरी जंक्शन या मध्यवर्ती स्थानांवर तब्बल २५ जेसीबी मधून एक टनापेक्षा जास्त फुलांची पुष्पवृष्टी जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं हे नाशिकवरून मागवण्यात आली असल्याचं मराठा आंदोलनाचे समन्वयक रमेश आंब्रे यांनी सांगितलं. बजरंगी पाटील यांच्या या ठाणे दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्यात आली होती. मराठा समाजाकडून बाईक रॅली आणि ढोल ताशांच्या गजरात जरांगे पाटील यांचं सर्वत्र मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं. आम्ही कोणाचेही हक्क हिरावून न घेता, स्वतःचं हक्काचं आरक्षण मागत आहोत. सरकारने ते आम्हाला दिलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.