ठाणे- धावत्या डेक्कन एक्सप्रेसमध्ये दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे पाय रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये अडकल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वांगणी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. खळबळजनक बाब म्हणजे या घटनेचा व्हिडिओ एका रेल्वे प्रवासी संघटनेने व्हायरल केल्याने ही घटना समोर आली आहे.
रेल्वे आणि फलाटामध्ये पाय अडकल्याने रेल्वेच्या दारात बसलेला प्रवासी गंभीर
धावत्या डेक्कन एक्सप्रेस मध्ये दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे पाय रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये अडकल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वांगणी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली आहे.
राजेंद्र नारायण सूर्यवंशी (५२) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. ते पुण्यातील खडकी बाजार परिसरात राहणारे असून पेशाने ते एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात. जखमी राजेंद्र हे आज दुपारच्या सुमारास पुण्यावरून डेक्कन एक्सप्रेसने पुढील प्रवासासाठी निघाले होते. यावेळी रेल्वेच्या दरवाजात बसून त्यांनी प्रवास सुरू केला. यादरम्यान सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डेक्कन एक्सप्रेस ही वांगणी स्टेशन ओलांडताना राजेंद्र यांचा एक पाय फलाट आणि रेल्वे मध्ये अडकला. त्यामुळे त्याला गंभीर इजा झाली. त्यावेळी काही प्रवाशांनी त्यांना दरवाजातून उचलून जखमी अवस्थेत एका बाकावर ठेवले. आणि नंतर कल्याण रेल्वे स्टेशन प्रशासनाला या घटने बद्दल सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन मास्टर राजू पवार यांनी डेक्कन एक्सप्रेस कल्याण स्थानकात येताच तत्काळ जखमीला उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती देऊन अपघाताची नोंद केली. सध्या राजेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत आहे.
दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, यापूर्वीही वांगणी स्थानकात फलाट व गाडी चे अंतर अगदी कमी असल्याने दरवाजाच्या पायरीवर बसलेले अनेक प्रवासी गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी दरवाज्यात बसून प्रवास करू नये असे आव्हान त्यांनी केले आहे.