ठाणे - मुंबई येथील डी.जी. कार्यलयात माझी ओळख असून याठिकाणी नोकरी लावून देतो, अशी थाप मारून एका ठगाने बदलापुरातील 'सिकंदर'ला चार लाखांचा गंडा घालून फरार झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ठगावर 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला. रोशन शेषराव चव्हाण (वय 32 वर्षे, रा. मालेगाव ,जी. वाशीम), असे गुन्हा दाखल झालेल्या ठगाचे नाव आहे.
सिकंदरच्या मुलीला होती नोकरीची गरज
बदलापूर पूर्वेकडील गांधी चौक परिसरातील एका इमारतीध्ये सिकंदर हमीद शेख (वय 48 वर्षे) हे कुटूंबासह राहतात. काही महिन्यांपूर्वी ठग रोशन याच्याशी ओळख झाली होती. त्यातच सिकंदर यांच्या सना नावाच्या मुलीला नोकरीची गरज असल्याची माहिती ठगाला मिळली. त्यानंतर त्याने सिकंदर यांना माझी मुंबईतील डी.जी. कार्यलयात ओळख असून तुमच्या मुलीला या कार्यलयात नोकरी लावतो, अशी थाप मारून सिंकदर यांच्याकडून वेळोवेळी नोकरी देण्याच्या बहाण्याने सुमारे 4 लाख 20 हजार रुपये उकळले.