ठाणे- राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अनंत करमुसे (40, रा.उन्नतीवुडस, आनंदनगर), असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून रविवारी मध्यरात्री आव्हाड यांच्या अंगरक्षकांसह अन्य काही जणांनी राहत्या घरातुन बोलावून आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर नेत त्यांच्या समक्ष बेदम मारहाण केली, असे करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात संचारबंदीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
माहिती देताना अनंत करमुसे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांनी पाच एप्रिलच्या रात्री दिवे लावण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला विरोध करीत मंत्री जिंतेंद्र आव्हाड यांनी विरोधी प्रतिक्रिया सोशल मीडियात व्यक्त केली होती. त्यावर अनंत यांनी आव्हाड यांच्या विरोधात फेसबुकवर एक अक्षेपार्ह्य पोस्ट टाकली. त्यावरून हा वाद झाला होता.
काठ्या तुटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप
तक्रारीत म्हटल्यानुसार, पाच एप्रिलच्या रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलीस गणवेषातील दोघे आणि साध्या वेषातील दोन पोलीस अनंत यांच्या घरी आले तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवले आहे, असे सांगत चारचाकीत बसवून पोलीस ठाण्यात नेतो म्हणाले. पोलीस ठाणे मागे गेल्यानंतर अनंत यांनी मला कुठे घेऊन जात आहात विचारणार केली. त्यावर सायबर गुन्हे शाखेला नेत असल्याचे ते म्हणाले. मात्र, आव्हाड यांच्या विवियाना मॉलजवळील बंगल्यावर नेले. या दोन्ही वाहनांमध्ये 10 ते 11 जण होते. तक्रारदाराने विचारल्यावर गाडीतील व्यक्तीनी साहेबांच्या बंगल्यावर नेत असल्याचे सांगितले. मध्यरात्रीनंतर बंगल्यात अनेक जणांनी पोलीसांकडील फायबर काठी तुटेपर्यंत मारहाण केली. काठी तुटल्यावर वेताचा बांबु, लोखंडी पाईप आणि कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली.
अनंत यांचे म्हणणे आहे की त्यांनी आव्हाडांबद्दलच्या पोस्टसाठी माफी मागितली त्यानंतरही बेदम मारहाण करण्यात आली. समाजमाध्यमावरील पोस्ट डिलीट करायला लावण्यात आली, अशी तक्रार अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, अनंत यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात आव्हाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
हेही वाचा -ठाण्यात सामाजिक संस्थेचा पुढाकार; तीन हजार आदिवासी कुटुंबांना दिलासा