ठाणे: काही दिवसापूर्वी लोणावळा येथील कार्ले डोंगरावरील एकविरा देवी विषयी आक्षेपार्ह पोस्ट वायरल झाली होती. त्याच पोस्टला कल्याण येथील एका तरुणाने कमेंट केली होती. कमेंट करणाऱ्याचा तरुणाचा शोध जमावाने घेऊन त्या तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच कल्याणच्या बारावे येथील एकविरा देवीच्या मंदिरात नेऊन देवीच्या समोर नाक घासायला लावले. तर अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंडही काढली आहे. या गंभीर प्रकरणाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी दखल घेऊन 25 ते 30 जणांच्या जमावावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आतापर्यंत बारा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
भक्तांच्या मनात संतापाची लाट: पुणे जिल्ह्यातील कार्ले येथील, एकवीरा देवी विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पूजा सावळे नामक युजरने इन्स्टाग्रामवर आई एकवीरा देवीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई येथील एकवीरा देवीवर श्रद्धा असणाऱ्या भक्तांच्या मनात संतापाची लाट उसळली होती. इंस्टाग्रामवर कमेंट करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू असतानाच, कल्याण येथील राहणाऱ्या युवकाला देवीवर श्रद्धा असणाऱ्या शेकडो तरुणांनी बेदम मारहाण केली. एकीकडे या घटनेबाबत आगरी कोळी समाजाचे काही तरुण शांततेत पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे काही तरुणांनी इन्स्टाग्रामवरवर पोस्ट करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांना मारहाण करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली: दरम्यान, आगरी कोळी या यूजर आयडीच्या मोबाईल फोनमधील फिर्यादीच्या इंस्टाग्राम अकाऊंडची तपासणी करताना, काही नेटकऱ्यांनी आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले. परिणामी, फिर्यादीने नमुदच्या इंस्टाग्राम खातेधारकाला त्याच्या पोस्ट हटविण्यास सांगितले होते. त्यानंतर १९ मे रोजी सायंकाळी 4:30 च्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कामाच्या ठिकाणी रिबन्स आणि बलून केकशॉप, अंबर वडापाव जवळ, सिनेमॅक्स खडकपाडा कल्याण पश्चिम येथे काम करत असताना, 20 ते 25 लोकांचा जमाव दुकानावर आला. फिर्यादीला वडवली अटाळी परिसरातील जंगलात बोलावून बेदम मारहाण केली. त्याचे कपडे फाडून त्याची रस्त्यावर धिंड काढली, त्याचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.