महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची झाडाला लटकवून हत्या, विकृत प्रियकर गजाआड - आरोपी दिपक जगन्नाथ रुपवते

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने तिच्या ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्येचा बनाव केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने प्रियकराला अटक केली आहे.

किरण सावळे
किरण सावळे

By

Published : Aug 16, 2020, 5:06 PM IST

Updated : Aug 16, 2020, 6:16 PM IST

ठाणे - लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची एका 31 वर्षीय विकृत प्रियकराने तिच्या ओढणीच्या साहाय्याने झाडावर लटकवून गळफास देत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहाण्याने बोलावत तिला एका निर्जनस्थळी नेत तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव या विकृत प्रियकराने रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात खुनी प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून डोंबिवली पश्चिम भागातून अटक करत आरोपीला कोनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिपक जगन्नाथ रुपवते ( वय 31 वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण पश्चिम), असे अटकेत असलेल्या खुनी प्रियकराचे नाव आहे. तर किरण सावळे (रा. चंदनशिव नगर वाडेघर गाव, कल्याण पश्चिम), मृत प्रेयसीचे नाव आहे.

आरोपी दिपक जगन्नाथ रुपवते

मृत तरुणी व आरोपी दीपक यांच्यात काही महिन्यांपूर्वी ओळख होऊन ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. आरोपी दीपक हा व्यवसायाने रिक्षा चालक असून त्याने मृत किरणकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, किरण त्याच्याशी विवाह करण्यास नकार देत होती. त्यामुळे त्याने प्रेयसी किरणचा काटा काढण्याचे ठरवले. त्याप्रमाणे 9 ऑगस्टला तिला कल्याणमधून बहाण्याने रिक्षात बसून भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा इमारती मागे असलेल्या झाडाझुडपात नेले. त्याठिकाणी पुन्हा तिच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता दोघांमध्ये वाद होऊन त्याने तिचा ओढण्याच्या साहाय्याने गळा आळवून हत्या केली. त्यांनतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती 3 दिवसांनी स्थानिक कोनगाव पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. याबाबत पोलीस ठाण्यात 12 ऑगस्टला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, मृत तरुणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यांनतर भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा बिल्डिंगच्या मागे एका तरुणीला तिच्या प्रियकराने जीवे मारले आहे. तो व्यक्ती डाेबिंवली पश्चिम भागात फिरत आहे, अशी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना त्यांच्या खबऱ्याने दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना बातमीची शहानिशा करुन पुढील कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून आदेश दिले.

त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने कोनगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता 12 ऑगस्टला दुपारच्या सुमारास मुंबई-नाशिक हायवेलगत टाटा आमंत्रा बिल्डिंगच्या मेन गेटपासून 50 मीटर अंतरावर झाडाझुडपात एका अनोळखी महिलेचा मृतदेह छोट्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. या प्रकरणी भिवंडी कोनगाव ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल असल्याचे या पोलीस पथकाला समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार दत्ताराम भाेसले, राजेंद्र घाेलप, राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के, अजित राजपुत, सुरेश निकुळे, बाळा पाटील, हरीचंद्र बंगारा, राहुल ईशी या पथकाने डोंबिवली पश्चिम भागात जाऊन रेल्वे स्टेशन परिसर, गुप्ते रोड, बागशाळा मैदान, असा परिसर पिंजून काढला. शेवटी कोपर ब्रिजजवळ एक व्यक्ती खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयास्पद स्थितीत फिरताना दिसून आला. त्याला पोलिसांचा संशय येताच तो पळू लागला असता त्यास पोलीस पथकाने पाठलाग करुन पकडले व ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे दिपक जगन्नाथ रुपवते, असे सांगितले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याने त्याची प्रेयसी किरण ही लग्नाला नकार देत असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कुठलाही सुगावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतूक होत आहे.

Last Updated : Aug 16, 2020, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details