नवी मुंबई -नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताच नवी मुंबईत मॉल शॉपिंग सेंटर, सिनेमागृहे, नाट्यगृहे टाळेबंदीनंतर खुली करण्यात आली होती. मात्र, ती आता पुन्हा बंद करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बंद करण्याचे आदेश
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मार्च महिन्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली होती. एप्रिल महिन्यात तर एका दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक 1 हजार 700 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. तसेच राज्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शहराती मॉल शॉपिंग सेंटर, नाट्यगृह, सिनेमागृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले होता. मात्र, कोरोनाची रूग्ण संख्या कमी झालेली पाहता 11 जूनला नियम पाळून हे मॉल, शॉपिंग सेंटर, नाट्यगृह सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने खुली करण्यास मुभा देण्यात आली. मात्र, शहरातील निर्बंध हटवल्यानंतर नागरिक नियमांचे उल्लंघन करून गर्दी करत होते. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परिणामी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मॉल शॉपिंग सेंटर, नाट्यगृह, सिनेमागृह पूर्णपणे बंद करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
बांधकाम साईट्स सुरू राहणार
नवी मुंबई शहरातील ज्या बांधकाम साईट्सवर मजूर राहण्याची सोय असेल, अशा ठिकाणचे बांधकाम सुरू राहील. ज्या बांधकामाच्या ठिकाणी मजूर बाहेरून येत आहेत तर त्या ठिकाणी फक्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत काम सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.