नवी मुंबई - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आफ्रिकेतील मलावी मँगो विक्रीस आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ऐन नोव्हेंबरमध्ये हापूसची चव चाखायला मिळणार आहे. हा आंबा १५ डिसेंबरपर्यंत बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
हिवाळ्यात आफ्रिकेतील मलावी हापूस बाजारात... आंबाप्रेमींची चंगळ कोकणातून नेल्या होत्या आंब्याच्या काड्या
आफ्रिकेत मलावी नावाच्या देशातील नागरिकांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग व दापोली परिसरातून आंब्यांच्या काड्या मलावीत नेल्या होत्या. त्यांच्यासाठी या काड्या नेऊन रुजवणं हा एक अभिनव प्रयोग होता. या काड्यांच योग्य संवर्धन करून त्यांचं रूपांतर कलमात करण्यात आलं. सुमारे १५०० हेक्टरवर कोकणातील हापूसच्या कलमांची लागवड करण्यात आली.
मलावी हापूस नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात उपलब्ध
मलावीमधील हापूस आंबा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. या फळांना परिपक्व होण्यासाठी अद्याप कही वेळ देणे आवश्यक आहे. आफ्रिकेच्या वातावरणातही आंब्याचे भरघोस उत्पन्न आले आहे. बाजारात हा आंबा "मलावी मँगो" या नावाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षीही हा आंबा विक्रीसाठी बाजारात आणण्यात आला होता. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे.
७०० ते ९०० रुपये किलोचा दर
मलावी मँगो दिसायला आणि चवीला पूर्णतः कोकणातील हापूस आंब्यासारखा आहे. या आंब्याच्या एका पेटीची किंमत ७०० ते ९०० रुपये किलो आहे. मलावीमधून हा आंबा जहाजातून येत असून नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दररोज ६०० पेट्या उतरत आहेत. हा आंबा १५ डिसेंबरपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती फळ विक्रेते संजय पानसरे यांनी दिली. खरं तर हापूस आंबा बाजारात एप्रिल व मे महिन्यात जास्तीत जास्त तसेच जूनच्या पंधरवड्यापर्यंत उपलब्ध होतो. मात्र मलावी मँगोमुळे आत्ता चक्क नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही हापूस प्रेमींना आंब्यांची चव चाखायला मिळणार आहे.