ठाणे Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाला सुरुवात झाली की सारा आसमंत हजारो पतंगांनी व्यापून गेलेला दिसत असे. लहान मुलं आणि युवावर्गात किती पतंग आणायचे, कुठला मांजा आणायचा याचीच चर्चा सुरू असायची. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा महाराष्ट्र आणि विशेष करून गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाळली जाते. परंतु, काळ बदलला आणि आधुनिकतेच्या जगात अडकलेल्या मुलांनी आणि युवकांनी पतंगांकडे पाठ फिरवली. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेली ही मुले या कलेपासून दूर गेली. पतंग व्यवसायाला शेवटची घरघर लागली. त्यामुळं पतंग विक्रेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय.
35 वर्षांपासून करताय व्यवसाय : ठाण्यातील भाजी मार्केट परिसरात मागील 35 वर्षांपासून अब्बू गफार मेमन (अब्बू चाचा) हे पतंग विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा हा व्यवसाय वर्षभर चालत असला तरी दिवाळीनंतर मकरसंक्रांती पर्यंत मोठ्या प्रमाणात पतंगांची विक्री होत असते. अत्यंत लहान अशा शोभेच्या पतंगापासून तीन फूट रुंदीच्या पतंगांपर्यंत, कागद आणि प्लास्टिक पासून बनवलेल्या पतंग आणि मांजा विकण्याचा व्यवसाय अब्बू चाचा करतात. पूर्वी अवघ्या पाच पैशांना मिळणारा पतंग आता पाच ते दहा रुपयांना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी कार्टून्स बरोबरच हिंदी चित्रपटांचे पोस्टर असलेले पतंगदेखील बाजारात उपलब्ध आहेत. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे मिशन 2024 चा विशेष राजकीय पतंगदेखील यावेळी त्यांच्याकडे पाहायला मिळाले. मात्र, यावर्षी जवळपास दोन लाखांचा माल आणला. पण आतापर्यंत फक्त त्यातील 30 टक्केच माल विकला गेल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुलं पतंग उडविण्याच्या कलेपासून दूर गेल्यानं आपल्या व्यवसायाला उतरती कळा लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.