ठाणे - येथील कल्याण-शीळ या रस्त्यावर शनिवारी एका कराचा भीषण अपघात होऊन कार चेंदामेंदा झाली असून कार मालक जखमी झाला आहे. यानंतर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे गेल्या वर्षभरापासून इथे लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरु असल्याचा आरोप स्थानिकांमधून केला जात आहे.
स्थानिकांच्या प्रतिक्रिया शनिवारी सकाळच्या सुमारास मानपाडानजीक एका ठिकाणी डक्टचा अंदाज न आल्याने एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने वाहनचालक बचावला तरी कारचे मोठे नुकसान होऊन कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. या अपघातानंतर अपघातग्रस्त ठिकाणी माती टाकून डक्ट बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
अपघातांची संख्या वाढली -
रांजणोली-कल्याण-शीळ मार्गाचे नव्याने रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -कोरोना लस घेण्याकरिता टाळाटाळ; नाग दाखवून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकाविले!
कल्याण-शीळ रोड वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून या रस्त्यावर २४ तास मोठ्या प्रमाणात रहदारी असते. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कल्याण ते शीळ या रस्त्याचे ६ पदरी रुंदीकरण आणि काँक्रिटिकरनाचे काम मागील २ वर्षांपासून सुरू आहे. यादरम्यान रस्त्याच्या मध्यभागी ठराविक अंतरावर भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी डक्ट सोडले आहेत. हे डक्ट बंदिस्त करण्यात आलेले नाहीत.
तसेच या ठिकाणी खड्डा असल्याची माहिती देण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेली नसल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न येणारे वाहनचालक रिकाम्या रस्त्यावरून वेगाने येताना या खड्ड्यात पडून जायबंदी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा संताप वाहनचालक व्यक्त करताना दिसत आहेत.