ठाणे : शनिवारी ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे तीन मजली इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. इमारतीच्या मलब्याखाली आणखी काही जण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई व आसपासच्या शहरी भागांमध्ये बहुमजली इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. नैसर्गिक आपत्तीसह मानवनिर्मित चुकांमुळे देखील अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील इमारती कोसळण्याच्या मोठ्या दुर्घटना :
- 3 सप्टेंबर 2021 रोजी भिवंडी महापालिकेच्या हद्दीत एक इमारत कोसळली. या अपघातात 1 जण ठार तर 9 जण जखमी झाले होते.
- 20 जुलै 2021 रोजी ठाण्याच्या कळवा परिसरात भूस्खलनामुळे इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत कोसळून चार महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर दोन लोकांना ढिगाऱ्यातून वाचवण्यात यश आले.
- 16 मे 2021 रोजी ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील एका इमारतीचा बेकायदेशीरपणे स्लॅब कोसळला. या घटनेमध्ये तीन महिलांसह पाच जणांना जीव गमवावा लागला.
- 21 सप्टेंबर 2020 रोजी भिवंडीत एक मोठी दुर्घटना घडली. येथील पटेल कंपाऊंड परिसरात एक तीन मजली इमारत कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू झाला, तर 25 जणांना वाचवण्यात NDRF ला यश आले.
- 5 ऑगस्ट 2015 रोजी ठाण्यात 50 वर्षे जुनी इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत 7 जण जखमी झाले होते.
- 29 जुलै 2015 रोजी ठाणे जिल्ह्यातील ठाकरुली शहरात दोन मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला.
- 6 एप्रिल 2013 रोजी ठाणे जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. शहरातील एक इमारत कोसळून तब्बल 72 जणांचा मृत्यू झाला होता तर 36 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. डायघर किशोर नाईक यांना निलंबित करण्यात आले होते.
- 17 ऑगस्ट 2010 रोजी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे चार मजली इमारत कोसळली. या घटनेत 10 लोक ठार झाले होते तर 20 जण जखमी झाले होते.