ठाणे - यंत्रमाग व्यवसायाला वीजदरात देण्यात येणारी सवलत सरकारने बंद केली. त्यामुळे भिवंडीतील हजारो यंत्रमाग कारखाने बंद अवस्थेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) महाराष्ट्रातील यंत्रमाग व्यवसाय उत्कर्षासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अस्लम शेख (Minister Aslam Shaikh) यांनी केले. ते भिवंडीत आयोजित केलेल्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांच्या (Textile Business) बैठकीत बोलत होते.
वस्त्रोद्योग राज्यमंत्री अस्लम शेख राज्यातील यंत्रमाग व्यावसायिकांमध्ये आक्रोश -
देशाचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील यंत्रमाग व्यवसाय टिकला तर अनेकांना रोजगार मिळणार असल्याने या व्यवसायातील व्यवसायिक उद्योजक टिकला पाहिजे यासाठी तत्पर असल्याचे मत मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले. मात्र, महाराष्ट्रातील २७ अश्वशक्ती पेक्षा अधिक भार असलेल्या यंत्रमाग कारखान्यास वीजदर सवलत डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. त्यावरून राज्यातील यंत्रमाग व्यावसायिकांमध्ये आक्रोश असून वीजदर सवलत मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया किचकट असल्याने त्यामध्ये सुलभ अर्ज असावा व त्यासाठी मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी ही मागणी जोर धरत असताना यंत्रमाग व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यमंत्री अस्लम शेख भिवंडीत आले होते.
वस्त्रोद्योग मंत्र्यांचा असाही खुलासा -
यंत्रमाग व्यावसायासाठी ज्या योजना सरकारने जाहीर केल्या आहेत, त्यापूर्वी या व्यावसायातील तज्ञ मंडळींशी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असती. तर भविष्यात येणाऱ्या अडचणी येणार नाहीत. त्यामुळे यापुढे येणाऱ्या योजना व वीजदर सवलतीसाठी सुलभ अर्ज प्रक्रिया कशी असावी हे मी स्वतः भिवंडीसह मालेगाव, सोलापूर, इचलकरंजी येथील यंत्रमाग व्यावसायिकांशी चर्चा करून समजावून घेणार असल्याचा खुलासा वस्त्रोद्योग राज्यमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.
यंत्रमाग व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे सरकार उभे -
कोरोनामुळे आधीच दोन वर्षे यंत्रमाग व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडला असताना तो पुन्हा स्थिरस्थावर करण्यसाठी महाविकास आघाडी सरकार यंत्रमाग व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. शिवाय राज्य सरकार कोणाच्या तिजोऱ्या तपासणारे नसून सर्वसामान्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी मदत करणारे काम भविष्यात करणार असल्याचे प्रतिपादन अस्लम शेख यांनी केले.
कार्यक्रमात कोरोना नियमाचे तीन तेरा-
बैठकीच्या प्रारंभी यंत्रमाग व्यवसाय संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी यंत्रमाग व्यावसायिकांच्या समस्या व व्यवसाय वाढी साठीच्या सूचना केल्या. या प्रसंगी वस्त्रोद्योग आयुक्त शीतल उगले, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर, माजी खासदार सुरेश टावरे, माजी महापौर जावेद दळवी यांसह विविध यंत्रमाग व्यावसायिक संघटनांचे मन्नान सिद्दीकी, पुरुषोत्तम वंगा, शरद शेजपालसह शेकडोच्या संख्येने यंत्रमाग व्यावसायिक उपस्थित होते. यामुळे कार्यक्रमात कोरोना नियमाचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले.