ठाणे - महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले ( Prakash Ambedkar Allegation Mahavakas Aghadi ) आहे. कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून, याचा आम्ही निषेध करतो. मात्र, एसटी कामगारांची न्यायालयात ज्या पद्धतीने बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली गेली नाही. न्यायालयाने कामावर रुजू होण्याची एक संधी दिली आहे. त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात केले होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. पण, तेव्हाच भूमिका आम्ही मांडली होती की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका. आता न्यायालयाने संधी दिली आहे. उर्वरित प्रश्ननंतर सोडवता येतील. मात्र, आता कामावर रुजू होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शिवनेरी मार्फत खाजगीकरण - या आधी एसटी प्रशासनाने जेव्हा शिवनेरीच्या मार्फत खाजगीकरण केले. तेव्हाच लढा द्यायला हवा होता. संपाबाबत जर न्यायालयात योग्य बाजू मांडली असती, तर जेवढे अभय दिले आहे. आणखी अभय मिळाले असते, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.