ठाणे - ९६२ वर्षे अतिप्राचीन असलेले अंबरनाथ शहरातील शिवमंदिराच्या वतीने महाशिवरात्रीची यात्रा ( Mahashivratri Yatra ) आयोजित करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यंदा महाशिवरात्रीला मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा केली जाणार आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश नसेल, अशी माहिती मंदिर विश्वस्त विजय पाटील यांनी दिली आहे.
केवळ मंदिर गाभाऱ्यात पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा
गत वर्षी महाशिवरात्रीला भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यंदाच्या वर्षांत राज्य शासनाकडून विविध निर्बंध हटवले जात असल्याने यंदाच्या महाशिवरात्रीला मंदिरात प्रवेशाची संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र, गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने मंदिराच्या विश्वस्तांना यंदाही शिवरात्रीच्या दिवशी मंदिर बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याला दाद देत विश्वस्तांनी यंदाच्या वर्षीही शिवरात्रीच्या काळात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीचा उत्सव काही तासांवर येऊन ठेवला आहे. त्यातच यंदा महाशिवरात्रीला मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा केली जाणार आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश नसेल, अशी माहिती मंदिर विश्वस्त विजय पाटील यांनी दिली आहे.