ठाणे :दिवाळी म्हंटल कि अनेकांच्या जिभेला पाणी सुटते ते म्हणजे दिवाळीतील फराळामुळे ( Maharashtrian Diwali food ). दिवाळीजवळ येताच अनेकांच्या घरी फराळाला सुरुवात होते. कारंजी, लाडू, चकली, चिवडा बनवायला घरातील महिला सज्ज होतात. गेली अनेक वर्ष दिवाळी आणि फराळ हे समीकरण या मातीशी नाळ जोडून राहिलेले आहे. पण अनेक भारतीय व्यवसायासाठी, नोकरी धंदयासाठी परदेशी स्थायिक झाले आहेत. मात्र हेच भारतीय पारंपरिक भारतीय सण हे परदेशात राहून देखील मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. मात्र सणांमधील पारंपरिक पदार्थांची चव मात्र परदेशात मिळत नसल्याने ठाण्यातील ऋतू फूड्स या उद्योग समूहाला दर वर्षी याच पारंपरिक फराळाची ऑर्डर विदेशातून येत ( Diwali food export ) असते.
३९ वर्षांपासून अग्रेसर : ठाण्यातील मराठी व्यावसायिक गेली ३९ वर्ष परचुरे कुटुंबीय या फराळ बनवण्याच्या कामात अग्रेसर आहेत. संपूर्ण फराळ बनविण्यासाठी १२ ते १४ कामगार काम करत असून या दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, कारंजी चकली, चिवडा परदेशी जाण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक सणाचे औचित्त साधून सणानुसार आणि ऋतूनुसार खाद्य पदार्थ या ऋतू फूड्समध्ये ( Ritu Foods ) तयार होत असल्याने , या उद्योग समूहाचे नाव ऋतू फूड्स असल्याचे यावेळी परचुरे यांनी सांगितले. तर फराळामध्ये देखील विविधता असून अनेक प्रकारचे लाडू, मसाला करंजी, असे विविध प्रकार देखील बनवले जातात आणि यासाठी मागणी वाढलेली असून ग्राहकांना देखील ते आवडत आहेत. याच उद्योगात तरुणाई देखील सामील झाल्याने वेगवेगळ्या कल्पनेने उद्योगाला वेगळी चालना देत आहेत. त्यामुळे परदेशात राहत असणाऱ्या अनेक नागरिकांची मागणी ऋतू फूड्सच्या फराळाला आहे.