ठाणे -२३ जानेवारीला ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' असा मजकूर मनसेच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे.
शिवसेना महाविकास आघाडीबरोबर गेल्याने त्यांचा 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरला आहे. त्यामुळे आता ते हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष देणार नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरला आहे. संपूर्ण राज्यासाठी आणि सर्वांसाठी योग्य असलेलाच निर्णय राज ठाकरे घेतील, असा विश्वास ठाणे-पालघर जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला.