ठाणे -उत्तर प्रदशेच्यालखनऊ पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या फरार आरोपीस महाराष्ट्र एटीएस व उत्तर प्रदेश एटीएस पथकाने मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन (वय 40 वर्षे, रा. ठाकूरपाडा रोशनी महलजवळ, मुंब्रा, ठाणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला उत्तर प्रदेश येथे नेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याचे कार्यवाही बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत पोलिसांकडून मिळाली अधिक माहिती अशी, उत्तर प्रदेश एटीएसच्या प्रमुखांनी महाराष्ट्रातील एटीएस प्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा करुन इनामी फरार आरोपीच्या अटकेसाठी महाराष्ट्र एटीएसची मदत मागितली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत आरोपी अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन यास बुधवारी मुंब्रा येथून अटक केली आहे.
अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन याच्यावर एटीएस लखनऊ पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि.चे कलम 419, 420, 467, 468, 471, 120 (ब), कलम 66 (डी) आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आरोपी हा फरार होता. आरोपी मेमन हा मुंब्र्याच्या ठाकुरपाडा परिसरात वास्तव्या आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. मेमनला अटक करण्यासाठी मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएस पथके शोध घेत होते. अखेर पथकाला यश आले आहे. यापूर्वीही 20 मे, 2019 रोजी उत्तर प्रदेशातील एटीएसचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी आले होते.