ठाणेUddhav Thackeray:भाजपानं राष्ट्रपतींचा आदर केला नसला, तरी आम्ही तसं करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच नाशिकच्या काळाराम मंदिरात जाण्यापूर्वी शिवनेरीला जाऊन शिव मंदिराचं दर्शन घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते शनिवारी (13 जानेवारी) ठाण्यात बोलत होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती : आधीच्या मंदिरांची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते होत असेल, तर राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते का होत नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केलाय. भाजपा राष्ट्रपतींचा आदर करत नसेल, मात्र आम्ही करणार नाही, असंही ठाकरे म्हणाले. 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार असून, त्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिलीय.
अटलबिहारी वाजपेयींचा फोटो गायब :"शिवडी न्हावा शेवा महामार्गावरील अटल सागरी सेतूच्या उद्घाटनावेळी फक्त नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला होता. तिथं अटलबिहारी वाजपेयींचा फोटो लावण्यात आलेला नाही. आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्ये कार्यक्रमाचं निमंत्रण राष्ट्रपतीला देणार आहोत. नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रपतींच्या हस्ते आरती करू. त्यावेळी फक्त त्यांचाच फोटो काढला जाईल, आमचा कोणाचाही फोटो काढला जाणार नाही, असं देखील ठाकरे म्हणाले.
देशाच्या अस्मितेचा उत्सव :अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही केवळ राम मूर्तीचीच नाही, तर देशाची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेच्या महत्त्वाच्या प्रतिष्ठेचा हा उत्सव आहे. यावेळी राष्ट्रपतींना अयोध्येला बोलावण्यात यावं. आम्ही काळाराम मंदिरात आरती करणार आहोत, त्या वेळी राष्ट्रपतींनी उपस्थित राहावे, अशी आमची इच्छा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.