ठाणे - जिल्ह्यात आधीच पाण्याची भीषण टंचाई आहे, अशातच आता यंदा मान्सून लाबंणीवर गेल्याने जिल्ह्यासह ग्रामीण भागात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गाव पाड्यांची संख्या आता ३००
पार पोहोचली आहे, गतवर्षीच्या तुलनेत गावांची संख्या दुपटीहून अधिक आहे त्यातच मान्सून लांबत चालला असल्याने वेळेत जर पुरेसा पाऊस झाला नाही तर परिस्थिती अत्यंत भयावह होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, यंदा शहापूर तालुक्यात ६५ गावे आणि १६३ पाडे तर मुरबाड तालुक्यात ३२ गावी आणि ४८ पाड्यात एकूण ४२ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाण्याची भीषण टंचाई, जिल्ह्यात ४२ टँकरने पाणीपुरवठा गेल्या कित्येक दशकांपासून जानेवारी ते जुलै दरम्यान ठाणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते हा इतिहास आहे, मात्र गेल्या दशकात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे बऱ्यापैकी टंचाईची झळ कमी झाली होती, गेल्या दोन वर्षात टंचाईग्रस्त गाव त्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात घसरला होता मात्र गेल्यावर्षी सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण चांगले असताना परतीचा पाऊस खूपच कमी झाला त्यामुळे सुरुवातीला जो पाणीसाठा होता त्यावर अवलंबून राहावे लागले त्यातच भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने खाली गेल्याने त्याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसला आहे.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घसरते राहिले आहे, एक जून ते १५ जुलै २०१५ पर्यंत ४०६४.३४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती, तर २०१७ साली जिल्ह्यात चांगला पाऊस पडला होता. एकूण ३ हजार १८० मि.मी. पावसाची नोंद झाली होती, तर २०१८ साली सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र २० सप्टेंबर २०१८ पर्यंत दरवर्षीच्या सरासरी इतका पाऊस पडला. त्यामुळे भूजल पातळी आधीच्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे दोन महिने आधीच पाणीटंचाईची झळ बसली. २०१८ साली जिल्ह्यात ८ एप्रिलला टँकर सुरू झाला असताना यंदा मात्र १२ फेब्रुवारीला टँकर सुरू करावा लागला. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवणार यापूर्वीच उघड झाले होते.
या दिवसात गेल्यावर्षी शहापूर तालुक्यातील ३० गावे आणि ९७ पाड्यात २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत होता तर मुरबाड तालुक्यात ९ गावे आणि २० पाड्यात ३ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत होता यंदा मात्र शहापूर तालुक्यात ६२ गावे आणि १६३ पाडे तर मुरबाड तालुक्यात ३२ गावे आणि ४८ पाड्यात एकूण ४२ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, विशेष म्हणजे वेळेत पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.