ठाणे - जिल्ह्यातील विविध भागात 100 घरगुती आणि व्यापारी गॅस सिलींडर वितरक एजन्सी कोरोनाच्या सावटातही कार्यरत आहेत. सिलींडरचा मुबलक साठा वितरक कंपन्यांकडे आहे. त्यामुळे कोणीही गॅस सिलींडर मिळणार नाही या भीतीने घाबरून जाऊ नये, असे आवाहन एजन्सी चालकांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प असले तरी ग्राहकांना नियमीत वेळेत सिलींडर मिळेल यासाठी एजन्सी चालक प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लोकल, एसटी, रिक्षा बंद असल्याने सिलींडरची घरपोच सुविधा देणारे काही कामगार कामावर येत नाही. तरी देखील ग्राहकांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था एजन्सी चालकांनी केली आहे. दुरच्या कामगारांना आणण्यासाठी दुचाकी, खासगी वाहने एजन्सी चलकाकडून घरपोच सेवा दिली जात आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल या सर्व गॅस पुरवठा कंपन्या येथील कर्मचारी व कामगार मोठ्या अडथळ्यांवर मात करीत आहेत. तसेच ग्राहकांना सिलींडरचा पुरवठा करीत आहेत. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत काम करताना गॅस, पेट्रोल पुरवठादार एजन्सीतील कोणीही कामगार, कर्मचारी, चालक आणि अन्य सेवकांचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याची तयारी पुरवठादार कंपन्यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सर्व प्रकारची खबरदारी कामगारांना घेण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत.
कोणतेही पुरवठादार कंपनीचा ग्राहक घरगुती सिलींडरपासून वंचित राहणार नाही याची दक्षता एजन्सी चालकांनी घेतली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राहकांनी घरबसल्या हेल्पलाइनच्या माध्यमातून सिलींडर नोंदणी करावी, एजन्सीत गर्दी करू नये तसेच ऑनलाईन माध्यमातून ग्राहक आपली रक्कम भरू शकतात, असे आवाहन शहापूर तालुक्यातील एचपीचे गॅस सिलींडर एजन्सीचे चालक संदीप शहा यांनी सांगितले.
उज्वला गॅस योजनेतील ग्राहकांना मोफत सिलींडर -
ठाणे जिल्ह्यात 44 हजार 152 पंतप्रधान उज्वला योजनेचे ग्राहक आहेत. त्यांना एप्रिल मे आणि जून महिन्यात प्रत्येकी एकेक मोफत सिलींडर मिळणार आहे. अशा ग्राहकांना केंद्र सरकार त्यांच्या बँक खात्यात मोफत सिलींडरची किंमत जमा करणार आहे. या रकमेतून ग्राहक गॅस एजन्सीत सिलींडर नोंदणी करणे आणि त्याची देयक रक्कम देऊ शकणार आहेत.