ठाणे - पावसाचे आगमन होताच केवळ एक ते दीड तास पावसाने धुमाकूळ घातल्याने भिवंडी शहरातील काही सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला आहे. तर अनेक सखल भागातील दुकांनासह रस्त्यावर पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसाने नालेसफाईची पोलखोल -
भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात आज सकाळपासून हवामानात बदल होऊन दुपारच्या सुमारास तास दीड तास मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडीत मुख्य रस्ता असलेल्या कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करत वाहतूक कोंडी फोडावी लागली. तसेच शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पहिल्याच मुसळधार पावसाने नाले सफाईची पोलखोल केली आहे.