ठाणे Lover Tried to Kill his Girlfriend : प्रेयसीसोबत झालेल्या किरकोळ वादातून प्रियकरानं तिच्या अंगावर कार घालून चिरडून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. अश्वजीत गायकवाड असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ओवळा भागात ही घटना घडली. अश्वजीतनं त्याच्या मित्रांच्या मदतीनं हा हल्ला केल्याचा आरोप त्याच्या प्रेयसीनं केलाय. सध्या तरुणीवर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अश्वजीतसह तीन जणांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नुकताचं प्रदर्शित झालेला अॅनिमल सिनेमात ज्याप्रकारे त्यातील पात्र क्रुरपणे वागतो, तसाच हा प्रकार असल्याच दिसून येतंय.
नेमकं काय घडलं :अश्वजीतची प्रेयसी उच्चशिक्षित असून घोडबंदर इथं राहते. अश्वजीत गायकवाडनं तिला सोमवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास ओवळा येथील एका हॉटेलजवळ भेटायला बोलावलं. तिथं त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यानंतर अश्वजितनं प्रेयसीला शिवीगाळ करुन जबर मारहाण केली. तसंच तिच्या डाव्या हाताला चावाही घेतल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. त्यानंतर अश्वजितनं त्याच्या मित्रांना तिला कारनं उडवून टाका असं सांगताच त्याचे मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडलं, असा आरोप पीडितेनं केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिनं आपल्या सोशल मीडियावरुन प्रियकर अश्वजीत गायकवाडनं जीवघेणा हल्ला केल्याची पोस्ट केली. यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे मदत मिळत नसून, पोलीस जबाब बदलायला सांगत आहेत. आरोपींमध्ये आणखीन एक पोलिसांचा मुलगा असल्यामुळं पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मदतीसाठी मी ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केली व त्यानंतर पोलिसांनी दखल घेतली - पीडित तरुणी