ठाणे-लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने विविध कारखान्यात काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यातच भिवंडीत वास्तव्यास असणाऱ्या परराज्यातील लूम कामगारांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याचे पाहवयास मिळाले. खळबळजनक बाब म्हणजे, त्या कामगारांनी आमची उपासमार सुरू असल्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हाच व्हायरल व्हिडीओ पाहून पोलिसही भावूक झाले होते. त्यांनतर या कामगारांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्या जेवणाचा प्रश्न सोडवल्याची घटना समोर आली आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी लागू केली तर केंद्र सरकारने देशभर लॉकडाऊन केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीतील लाखो कामगार बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच भिवंडीतील कारीवली रोड वरील रज्जाक कंपाउंड येते बिहार राज्यातील ३० कामगार एकाच गाळ्यात (खोली) राहून वेगगेवळ्या लूम कारखान्यात काम करतात. मात्र, १८ मार्चपासून लूम कारखाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. हे कामगार बिहार राज्यातील असून चार दिवसापूर्वी देशात लॉकडाऊन पुकारल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.