ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता सर्वांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा लागली आहे. राज्यात सर्वत्र चांगले मतदान झाले.तिसऱ्या टप्प्यात पुणे मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले होते. त्यानंतर चौथ्या टप्यात सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे. मतदान कमी झाल्याने राजकीय पक्ष व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यातच कल्याणचा सुभेदार ठरण्याचे निकाल हाती यायला अवघे ४८ तास उरल्याने कोण जिंकणार व कोण हरणार?यावर आता कपभर चहापासून ते पार्टीपर्यंत अनेकांच्या छोट्या-मोठ्या पैजा लागल्या आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात तब्बल २८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तरीही शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात सरळ लढत झाली. मागील निवडणुकीत नवख्या असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी मोदी लाटेत तब्बल अडीच लाखांचे मताधिक्य मिळवले होते. यंदा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जातीचे राजकारण तापले होते. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांना किती होतो,हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे दुप्पट मतांनी निवडून येतील,असा दावा सेनेकडून करण्यात आला आहे.तर आश्चर्यकारक निकाल असेल,असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.