ठाणे - एकीकडे लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बसून कंटाळले आहेत. त्यात सकाळी संध्याकाळ टीव्हीवर फक्त कोरोना आणि कोरोनाच. मोबाइल हातात घेतला तरी तिकडेही कोरोना. त्यामुळे नागरीक कोरोनामुळे चांगलेच कंटाळले आहेत. त्यावर घोडबंदरमधील ब्रम्हांड सोसायटीने एक तोडगा काढत, सोसायटीच्या रहिवाशांचे कसे मनोरंजन होईल याकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी सोसायटीतल्या गायकांना एक व्यासपिठ देऊन सोसयटीच्या रहिवाशांचे मनोरंजन करण्याची संधी दिली आहे. त्यातून रहिवाशीही खुष आहेत.
ब्रम्हांड फेज 6 मधील रहिवाशांची करमणूक व्हावी या उद्देशाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी सोसायटीतील एका सदस्याने सोसायटीच्या आवारातच गिटार हातून घेऊन गाण्यांचा नजराना पेश केला. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनातील भीती तर कमी झालीच शिवाय कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी एक प्रकारे उर्जा देखील मिळाली आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातही कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमुळे नागरीकांना दिवसभर घरीच राहावे लागत आहे. त्यामुळे चिडचीड देखील त्यांच्यात सुरू झाली आहे. त्यात सकाळ पासून रात्रभर टीव्ही लावला तरी कोरोनाची भिती सतत मनात घर करून जात आहे. त्यामुळे मानसिक खच्चीकरण आणि त्यातूनच इतर आजारांनाही यातून आमंत्रण दिले जात आहे.