ठाणे- रेल्वे आणि एसटी बसस्थानकात बूट पॉलिश करून कुटुंबाची उपजीविका चालवणाऱ्यांवर दुहेरी संकट कायम आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बूट पॉलिशवाले मेटाकुटीला आले होते. त्यात आता पावसाळा आल्याने कोणीच बूट पॉलिश लवकर करीत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरायची कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून देशासह राज्यात लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत शासनांच्या नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने ग्रामीण भागात एसटीची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे एसटी स्थानकातील हॉटेल सोडून इतर लहान व्यवसायाला नियमांनुसार परवानगी दिली आहे. त्याच नियमानुसार श्याम देवराम यांनाही डेपो व्यवस्थापकाने एसटी स्थानकात बूटपॉलिश करण्याची परवानगी दिली. मात्र, लॉकडाऊनचा सव्वा दोन महिन्यांचा काळ खूपच कठीण गेल्याचे श्याम देवराम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. श्याम हे कल्याण एसटी डेपोत गेली 36 वर्ष बूट पॉलीश करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्या कुटुंबात तीन मुले, तीन मुली आणि पत्नी असून या सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
बूट पॉलिशवाल्यांवर दुहेरी संकट, आधी लॉकडाऊन तर आता पावसाळ्यामुळे ग्राहक मिळेना - बुट पॉलिश करणारे
लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच उद्योगधंदे बंद पडले. सर्वात जास्त त्रास झाला तो हातावर काम असणाऱ्यांना. यामध्ये बूट पॉलिश करणाऱ्यांचाही समावेश होता.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला थोडीफार रक्कम शिल्लक असल्याने त्यावरच गुजराण केल्याचे श्याम देवराम सांगितले. त्यानंतर मात्र एक वेळ अन्न मिळणेही कठीण झाल्याने बूट पॉलिश सोडून त्यांनी हमाली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातही हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. आता राज्य सरकारने पुन्हा एसटीची सेवा सुरू केल्याने गेल्या आठ दिवसांपासून आपण बूट पॉलिश करण्यास सुरुवात केल्याचे श्याम यांनी सांगितले. मात्र आता पावसाळा आल्याने कधी ग्राहक येतात तर, कधी नाही. बूट पॉलिश केल्यानंतर एका ग्राहकाकडून किमान 15 ते 20 रुपये मिळतात. सध्या साधारणपणे दिवसात 10 ते 15 ग्राहकच बूट पॉलिश करीत असल्याने भाजीपाला घरी घेऊन जाण्यापुरते पैसे मिळतात. त्यातच डेपोमध्ये बूट पॉलीशवाल्यांना 1 हजार 900 रुपये भाडे एसटी प्रशासनाकडून दरमहा आकारण्यात येते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने किमान आमचे तीन महिन्यांचे भाडे तरी माफ करावे, अशी अपेक्षा श्याम देवराम यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात 25 ते 30 बूट पॉलिशवाले आहेत. तर कल्याण एसटी डेपोत 2 अधिकृत बूट पॉलिशवाल्यांपैकी एक श्याम देवराम आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरात व स्थानकातील सर्वच व्यवसाय बंद ठेवल्याने बहुतांश बूट पॉलिशवाल्यांची उपासमार सुरू झाल्याने ते गावी गेले आहेत. आता पुन्हा रेल्वे प्रशासनाने त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली, तरच ते कल्याण रेल्वेस्थानकात व्यवसाय करणार असल्याचेही श्याम यांनी सांगितले.