ठाणे - कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाण्यातील श्रीनगर येथे सुविधा भूखंडावर बांधण्यात आलेल्या इमारतीत विलगीकरण कक्ष बनविण्यास स्थानिकांकडून विरोध झाला. यानंतर, कोरोनाबाधित व्यक्तींना कासारवडवली येथील बीएसयुपीच्या इमारतीतमध्ये ठेवण्यासही स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.
या इमारतीमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी अचानक खाट आणि इतर सामान सोमवारी सकाळी आणायला सुरुवात करताच, या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले. स्थानिकांमध्ये रोष एवढा होता की, त्यांनी येथील खाटदेखील बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर आणि इतर नगरसेवकांनी पालिका यंत्रणेशी संपर्क केला. त्यानंतरस नागरिकांचा प्रचंड विरोध असल्याने त्या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा वॉर्ड या ठिकाणी सुरू करणार नसल्याचे लेखी आश्वासन मिळावे, यासाठी हजारो नागरिकांनी सह्यांचे निवेदन ठाणे महापालिकेला दिले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रभारी पालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशी चर्चा केल्यानंतर श्रीनगर येथील आयसोलेशन वॉर्डची कल्पना बारगळली होती. त्यानंतरच कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये वॉर्ड करण्याचा घाट घालण्यात आला. परंतु, स्थानिकांना याची खबर लागताच त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एक तर हा वॉर्ड सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. तर, दुसरीकडे ही इमारत कासारवडवली गावाला लागून असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याची शंका सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केली आहे.