ठाणे :कोरोना काळात संपूर्ण जग चार भिंतींमध्ये कैद असतानाच गृहिता विचारे ही एक आठ वर्षांची चिमुकली मात्र जग जिंकण्यासाठी आपल्या पंखांमध्ये बळ एकवटत होती. आजोबा नरेश भोसले आणि वडील सचिन विचारे यांच्याकडून तिला गिर्यारोहणाचे बाळकडू मिळाल्यानंतर तिने उंच भरारी घेत थेट माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्यालाच गवसणी घातली. एकूण 15 दिवसांचा हा ट्रेक अत्यंत खडतर आणि तिच्या इच्छाशक्तीची परीक्षा घेणारा ठरला. उणे तापमान, थंड बोचणारे वारे आणि ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी या सर्व आव्हानांना सामोरे जात तिने 13 दिवसात माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत धडक मारली. एकूण 148 किलोमीटरचा हा ट्रेक तिला तब्बल 5,364 मीटर एवढ्या उंच एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत घेऊन गेला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे तिने हे यश संपादन केले.
गृहिता आणि हरिताचे यश : आता गृहिताने थेट साऊथ अफ्रिकेच्या माउंट किलिमंजारो, या आफ्रिका खंडातील सर्वांत उंच शिखराला गवसणी घालण्याचा निर्धार केला आहे. ती 10 ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी बेस कॅम्पवर भारतीय ध्वज फडकवून भारताचा नावलौकिक सातासमुद्रापार नेण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. गृहिता व तिची बहीण हरिता या दोघीही गिर्यारोहण करत असून त्यांनी आतापर्यंत 16 लहान-मोठे ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या दोन्ही बहिणींनी आतापर्यंत 2596 फुटाचे मलंगडपासून महाराष्ट्राचे सर्वांत उंच 5400 फुटाचे कळसुबाई शिखरापर्यंतचे अनेक गड किल्ले यशस्वीरीत्या सर केले.