ठाणे - एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दिवसांगणिक 800 ते 900 च्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका प्रशासनाने बंद केलेली कोविड सेंटर पुन्हा सुरू केली आहे. त्यातच डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमधील दारु व गांजा पार्टी सेंटर मधील कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे दारू व गांजा पिण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव करणाऱ्या त्या तरुणाने त्यांचा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करत असतानाच याचा राग मनात धरुन पार्टीबाज कर्मचाऱ्यांनी त्या तरुणालाच बेदम मारहाण केल्याच्या प्रकारामुळे ही घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोविड सेंटरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या शेडमध्ये सुरू होती पार्टी
राज्यासह जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांच्या वस्तू चोरीस जाणे, महिलांचा विनयभंग होणे या घटना वारंवार घडतच आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी डोंबिवली क्रीडा संकुलात महापालिकेचे कोविड सेंटर आहे. या कोविड सेंटर एका कंत्राटदारास चालवण्यास दिले आहे. कोविड सेंटरच्याजवळ तांत्रिक कर्मचारी वर्गासाठी एक शेड उभारण्यात आला आहे. याच शेडमध्ये बसून होळीच्या पूर्वसंध्येला काही कर्मचारी दारू व गांजा पार्टी करत असल्याची बाब राजू आलम या तरुणाची लक्षात आली. राजू आलम हा एसी दुरुस्तीचे काम करतो. त्याने कर्मचाऱ्यांना दारू पिण्यास मज्जाव केला. ते दाद देत नसल्याने त्याने त्यांचा व्हिडीओ काढला. दारू, गांजा पिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी राजू आलमलाच बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे कोविड सेंटरमधील गैरप्रकार उघडकीस आला आहे.