४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळून दुर्घटना ठाणे Thane Lift Collapsed :लिफ्ट वापरत असताना काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय.कारण, अचानक लिफ्ट कोसळल्यानं 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ठाण्यात घडलीय. ही घटना रुणवाल गार्डन, नारायणी स्कूलच्या बाजूला, हायलँड पार्क, बालकुम, ठाणे, (प.) याठिकाणी घडलीय. लिफ्ट कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी धावाधाव करत अग्नीशमन दलाला माहिती कळविली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागानाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतामधील सातही जण कामगार असल्याची माहिती समोर येत आहे.
सात जणांचा मृत्यू -बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू-बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. यातील एका कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून दुसऱ्या कामगाराचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव-स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी लिफ्टचे कंत्राटदारांना व साईट इन्चार्जना दोषी ठरवून कडक कारवाईची मागणी केली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठपोलिसांनी घटनेची माहिती घेऊन पंचनामा करत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. लिफ्ट कोसळल्यानंतर या परिसरात मोठ्याने आवाज झाला. या ठिकाणी काम करत असलेले इतर कामगार अपघाताच्या स्थळी पोहोचले. लोखंडी दरवाजे असलेल्या या लिफ्टला तोडून बाहेर काढण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांकडे सुरक्षा उपकरणांचा अभाव घटनास्थळी दिसून आला. स्थानिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. जर सुरक्षेच्या उपाययोजना असत्या तर बळींची संख्या कमी झाली असती असा अंदाजदेखील स्थानिकांनी वर्तविला.
अशी आहेत मृत व जखमींची नावे- सुनिल कुमार दास (पु / वय २१ वर्षे ) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर महेंद्र चौपाल (३२ वर्षे ), रुपेश कुमार दास ( २१ वर्षे ), हारून शेख (४७ वर्षे ), मिथलेश (३५ वर्षे ) आणि कारिदास (३८ वर्षे ) अशी मृतांची नावे आहेत. मृतामधील सहाव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. मजल्यावर लिफ्टचा रोप तुटल्याने अपघात होऊन लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेन्टमध्ये कोसळली होती. अग्निशमन दलाचे जवान ०१ - इमर्जन्सी टेंडर व ०७ - रुग्णावाहिकांसह घटनास्थळी उपस्थित होते.
लिफ्टचा वापर कसा करावा-लिफ्टचा वापर करताना अशी घ्या काळजी- लिफ्टमधून बाहेर पडताना आणि चढताना सावधानतेने पावले टाकण्याची आवश्यकता असते. लिफ्ट चालत असताना मध्येच थांबविण्यासाठी हात किंवा कोणत्याही वस्तुचा वापर करणे धोक्याचे असते. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास तांत्रिक बिघाड होण्याची भीती असते. त्यामुळे लिफ्टमध्ये गर्दी करणं टाळावा. लिफ्टचा वापर हा १२ वर्षांहून कमी वयाच्या मुलांनी करताना पालकांकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं असते.
हेही वाचा-
- Elevator Accident Pune: 'देव तारी त्याला कोण मारी'....मुलगा, आई बाहेर पडताच लिफ्ट कोसळली; पहा व्हिडिओ
- Elevator collapsed : कमला मिलमध्ये ट्रेड वर्ड बिल्डिंगची लिफ्ट कोसळून 8 जण जखमी