ठाणे - दोन ट्रक चालकांसह एका क्लिनरची निर्घृण हत्या करून मैद्याच्या गोण्यांचा ट्रक पळविणाऱ्या त्रिकुटाला जिल्हा न्यायालयाने तिहेरी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. एम. पटवर्धन यांनी याबाबतचे आदेश दिले.
अनिस नबी खाँ, सकुर अब्दुल रहेमान खाँ आणि अजितकुमार मिश्र अशी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सुकूर नावाच्या आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यातून शोधून काढले होते, अशी माहिती या गुन्ह्याचा शोध घेणारे ठाणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. या आरोपींनी ट्रकचालक राजेश यादव, हरिसिंग बलराम आणि क्लिनर नितीन बलराम यांची हत्या करून दुसरा क्लिनर छोटू ऊर्फ श्रीकांत यादव याला देखील जखमी केले होते.
हेही वाचा -'राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटतेय, रोज नवीन काहीतरी बाहेर काढताहेत'
भिवंडी तालुक्यातील भिवंडी-पडघा रस्त्यावरील धापशीपाडा गावाच्या शिवारात ३० नोव्हेंबर २०१२ रोजी सापडलेल्या मृतदेहाच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांवरून हा मृतदेह ट्रक चालक राजेश याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस निरीक्षक खैरनार यांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. तेव्हा एका वाहतूकदार कंपनीचे ३ ट्रक गायब असल्याच्या तक्रारीने मोठा दुवा पोलिसांच्या हाती लागला. यानंतर शोध घेतला असता भिवंडी-कशेळी पुलाजवळ क्लिनर छोटू यादव हा जखमी अवस्थेत आढळला. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी दोघांचे मृतदेह पोलिसांनी शोधून काढले. तपास करून पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर आरोपींनी हत्येची कबुली दिली.
हेही वाचा -जातपंचायतीमुळे तरुणीची आत्महत्या; आई-वडिलांच्या आंतरधर्मीय विवाहामुळे जातीत घेण्यास होता नकार
याप्रकरणी, दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्या. पटवर्धन यांच्या न्यायालयासमोर आले. त्यावेळी सरकारी वकील वर्षा चंदने यांनी सादर केलेले पुरावे आणि २४ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानण्यात आली. यानंतर आरोपी त्रिकटूला तिहेरी हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबत प्रत्येकी १० हजार रुपये दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.