ठाणे (कल्याण) - येथील मलंगगडावर पुन्हा एकदा बिबट्या आढळला आहे. मलंगगडाच्या पहिल्या दर्ग्याजवळ मंगळवारी (दि. 29 सप्टें.) रात्रीच्या दहा वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या वावरताना आढळूला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यापूर्वीही अनेकदा मलंगगड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आढळला आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कल्याणच्या मलंगगडावर बिबट्याचा वावर, नागरिकांत भीतीचे वातावरण
कल्याण येथील मलंगगडावर बिबट्याचा वावर वाढला असून वन विभागाने बिबट्याला कैद करावे, अशी मागणी आसपासच्या ग्रामस्थांनी केली आहे.
हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात या भागात येत असल्याची शक्यता असून काल रात्रीच्या सुमारास मलंगगडावरील पहिल्या दर्ग्याजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. यापूर्वीही टाळेबंदीच्या काळात एक बिबट्या मलंगगडावर आढळला होता. त्यावेळीही बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यामुळे वन विभागाने या परिसरात गस्त घालून त्या बिबट्याचा शोध घेत होते. मात्र, त्यांना त्यावेळी बिबट्या आढळला नव्हता. दोन दिवसांपूर्वीची मलंगगडच्या डोंगराला लागून असलेल्या वांगणी परिसरातही ग्रामस्थांना बिबट्या आढळला होता. बहुदा हाच बिबट्या भक्ष्याच्या शोधात मलंगगडच्या डोंगरावर वावरत असल्याचा कयास लावला जात आहे. तर दुसरीकडे, या बिबट्याला तातडीने पकडून जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
हेही वाचा -कोरोनाच्या नावे नागरिकांची लूट.. अधिकार नसतानाही क्लिनअप मार्शलकडून दंडवसुली, गुन्हा दाखल