ठाणे - येऊर येथे मंगळवारी दिसलेला बिबट्या बुधवारी सकाळी वनविभागाने पकडला. जुलाब, ताप व अन्न न मिळाल्याने बिबट्याला अशक्तपणा आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बोरिवली वन्यजीव बचाव केंद्र येथे नेण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
येऊर लाईट हाऊस हॉटेलच्या पाठीमागे एक बिबट्या, जखमी अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. तेव्हा वन विभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी बिबट्याचा चालताना तोल जात असल्याचे व काही अंतर जाऊन परत जागेवर बसत असल्याचे सांगण्यात आले.
बचाव पथकाची शोध मोहिम सुरू असताना, काळोख पडल्याने व बिबट्या हा पुर्णपणे शुद्धीत असल्याने, तो आक्रमक होऊन प्रति हल्ला करण्याची दाट शक्यता व्यक्त करत वनविभागाने शोध मोहिम थांबवली. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्या बिबट्याच्या शोध मोहिमेला सुरुवात झाल्यावर ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या झाडीमध्ये बसल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांच्या नजरेस पडला. त्याची हालचाल मंदावल्याचे दिसून आली. यावेळी, बिबट्या मोठमोठ्याने डरकाळी फोडून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आश्रय घेण्याचा प्रयत्न करत होता.
भुलीचे दिलं इंजेक्शन
याचदरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध केले. त्यानंतर बचाव पथकाने त्याला ताब्यात घेतले. प्रत्यक्ष पाहणीत तो बिबट्या हा आजारी असल्याचे वन विभागाने सांगितलं. ही मोहीम बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक (संरक्षन -१) दिगंबर दहिबावकर, पशुवैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे, बोरिवली बचाव पथकाचे विजय भारवदे, येऊर परिक्षेत्राचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी यशस्वी पार पाडली.