नवी मुंबई -नवी मुंबईत एका वकिलाने क्लाइंट असलेल्या शिपिंग कंपनीच्या मालकाकडून 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली, मात्र पैसे दिले नाही म्हणून या वकिलाने क्लाइंटचे नवी मुंबईतून अपहरण केेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमल झा असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधत खासघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान झा याला अटक करण्यात आली असून, त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
वकील विमल झा याने आपल्या क्लाइंटला डोळ्यावर पट्टीबांधून 3 वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेत मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. ज्या गाडीतून अपहरण करण्यात आले त्या गाडीचे टोल नाक्यावरील CCTV फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुटका
नवी मुंबईतून पहिल्यांदा कर्जतनंतर कल्याण रोड मार्गे मुरबाड आणि त्यानंतर माळशेज घाट गाठत आळे फाटा मार्गे नाशिकला एका फार्म हाऊसवर संबधित पिडीत व्यक्तीला वकिलाने बंद खोलीत ठेवले होते. सुटकेसाठी पैसे मागण्यात येत होते, पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण देखील करण्यात आली. तसेच पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील अपहरण झालेल्या व्यक्तीने केला आहे. दरम्यान आरोपी नाशिकच्या एका मॉलमध्ये खरेदी करत असतान, अपहरण झालेल्या व्यक्तीने त्याची नजर चुकवून तेथील एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून बायकोला फोन केला. ज्या नंबरवरून कॉल आला तो नंबर ट्रेस करून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.