ठाणे - स्मशानभूमीतील सरण (लाकुड) संपल्यामुळे मृतदेह दोन तास अंत्यसंस्काराविना पडून राहिल्याची संतापजनक घटना उल्हासनगरच्या मुक्ती बोध स्मशानभूमीत घडली. या प्रकारामुळे नातलगांसह स्थानिकांनी उल्हासनगर पालिकेवर रोष व्यक्त केला.
उल्हासनगर कॅम्प चार व्हीनस चौक येथील राधेश्याम नगर परिसरात राहणारे सदानंद कामातीकर यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी मुक्ती बोध स्मशानभूमीला संपर्क साधून तयारीला सुरुवात केली. या स्मशानभूमीत पालिकेच्यावतीने एका सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत अंत्यसंस्कारासाठी लागणारा लाकुड माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असतानाही अंत्ययात्रा स्मशानभूमीत दाखल झाल्यावर लाकडेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना स्मशानभूमीत दोन तास ताटकळत बसावे लागले.